असं वाटत नाही
नशीब काही सोडेल माझी पाठ असं वाटत नाही
या जगण्याचे ही कारण नक्की काय, अजून धाट्त नाही
दु:खावर मी केली अश्शी मात,
हसता हसता दुखून आले दात,
आरसा म्हणतो हसणा-या बाळा, मी फसत नाही !
माझे जिणे भरभरलेले ढग,
पाण्याने या पोटी लागे रग,
देवाजी ची किमया हे पाणी कधी आटत नाही !
चालत रहाण्यासाठी जो हट्टी,
त्याची नेहमी खड्ड्यांशी गट्टी,
अस्सा मी प्रवासी त्याला गाव कधी भेटत नाही !
हाती येता कागद लिहीतो मी,
आपली आपण टाळी घेतो मी,
शब्दांनी या बेरड होता पान कधी फाटत नाही !
दुर्दैवाच्या दुर्दैवाते ते
माझ्या रूपे निर्लज्जा भेटे,
कानी देते धमक्या ते हजार मी बधत नाही !
हे नशीब काही सोडेल माझी पाठ असं वाटत नाही
या जगण्याचे ही कारण नक्की काय, अजून धाट्त नाही
- संदिप खरे
0 अभिप्राय